महाराष्ट्र ग्रामीण

Uddhav Thackeray : आरएसएसवाले गच्चीतून देशप्रेम शिकवतात, स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नसणाऱ्यांच्या हाती देशाची सूत्रे: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On RSS: आम्हीही हिंदू आहोत, पण भाजपवाले आता दैवतांवरुन भांडण लावण्याचं काम करत आहेत, भाषिक प्रांतवाद करत आहेत असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. 

मुंबई : ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये काडीचाही संबंध नाही अशा लोकांच्या हाती आज देशाची सूत्रे आहेत. पाकिस्तानविरोधात युद्ध सुरू झाले तर हे गच्चीतून देशप्रेम शिकवतात असा टोला उद्धव ठाकरे यांनी आरएसएस आणि भाजपला लगावला. दैवतांवरून भांडण लावणारे आता भाषेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण करत आहेत असाही आरोप त्यांनी केला. मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात पार पडलेल्या ईशान्य मुंबई पदाधिकारी निर्धार शिबीरात उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “आरएसएसवाले हे गच्चीत काठ्या घेऊन बसतात, त्या काठ्या कपडे वाळत घालायला ठिक आहे. पाकिस्तानविरोधात युद्ध सुरू असताना घराच्या गच्चीतून हे देशप्रेम शिकवणारे लोक आहेत. जसा यांचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही तसाच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी काही संबंध नाही. ज्यांचा स्वातंत्र्याशी संबंध नाही त्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत.”

आम्ही मोहन भागवतांचे फॉलोअर आहे. तेच कुंभमेळ्यात गेले नाहीत तर आम्ही कसे जाणार? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. छावा चित्रपट आला. त्यामध्ये भाजप वाल्यांचा कर्तृत्व काय? त्यामध्ये तुमचा काय संबंध? आणाजी पंताने भगव्याला डाग लावलेला पाहायला जायचं असेल तर जा असाही टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही

देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “कामाला स्थगिती द्यायला काय उद्धव ठाकरे आहे का? असं विचारणारे फडणवीस हे उद्धव ठाकरे कधीच होऊ शकणार नाहीत. आपल्या राज्याचे नुकसान होऊन त्यांच्या मालकाच्या मित्राचे खिसे भरणारे हे उद्धव ठाकरे कधीच होऊ शकणार नाहीत.”

भाजपवाले दैवतावरून भांडण लावतात

आम्हीही जय श्री राम म्हणतोय. रामावर यांचा काय अधिकार आहे? आम्हाला भाजपमुक्त राम पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, “आम्ही जय श्रीराम म्हणणारच, पण भाजपवाल्यांना जय शिवाजी, जय भवानी म्हणायला लावणार. तुम्ही आता दैवतावरून भांडणे लावताय?”

भाषिक प्रांतवाद सुरू केला

संघाच्या भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेवरून केलेल्या वक्तव्याचा समाचार उद्धव ठाकरेंनी घेतला. ते म्हणाले की, “गुजरातबद्दल आम्हाला द्वेष नाही. पण हे लोक आता भाषिक प्रांतवाद सुरू करत आहेत. देशामध्ये आम्ही हिंदू आहेत, तर महाराष्ट्रात आम्ही मराठी आहोत. घाटकोपरची भाषा गुजराती म्हणतात. आम्हाला शिकवू नका. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही यांनी फुट पाडण्याचं काम केलं.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button