घरफोडितील आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद
जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी संबंधितांना आदेश दिलेले होते व या संदर्भात मार्गदर्शन देखील केले होते.
एमआयडीसी परिसरातील जगवाणी नगरच्या गेट समोरिल दुकान नंबर ४ चे चॅनेल गेट तोडून, शटर उचकवून आत प्रवेश करून चोरांनी ६ गोण्यांमधील अंदाजे ३५० किलो वजनाचे ६५००० रू. किंमतीचे जुने स्क्रॅप व १५० किलो वजनाच्या नविन कॉपरच्या वायरी असा एकूण १८५००० रु. किंमतीचा मुद्देमाल चोरलेला असल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे नोंदविण्यात आलेली असून त्यानुसार गु. र. न. ३०२/२०२५ BNS कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पुणे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस पथकातील पोलिस शिपाई राहुल घेटे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पंचमुखी हनुमान मंदिरा मागील रणछोड नगर मधील रितेश संतोष असेरी, वय ४६ वर्षे याला त्याच्या राहत्या घरातून सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्याचा साथीदार रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी, वय ३२ वर्षे याला रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पाठलाग करत मोठ्या शिताफीने पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलिस नाईक प्रदीप चौधरी, पोलिस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, किरण पाटिल, राजेश बच्छाव यांनी ताब्यात घेतले.
सदर आरोपींनी चोरीस गेलेला मुद्देमाल कोठे विकला याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, रवी नरवाडे, अक्रम शेख यांच्या माहितीवरून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून सदर आरोपी यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेऊन या संशयितांकडून ५४००० रु. किमतीचे १०० किलो वजनाचे जुने तसेच नविन तांब्याचे तार असा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक राहुल तायडे व पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे हे करीत आहेत.
सदरचा गुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस, उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, राहुल घेटे, किरण पाटील, राकेश बच्छाव, जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, रवी नरवाडे, अक्रम शेख यांनी उघडकीस आणलेला आहे.





