पुण्यातील लोणीकंद ऐथे जमिनीच्या वादातून केली गोळीबार


पुणे प्रतिनिधी– केसनंद येथे जमिनीच्या वादातून तिघांनी गावठी पिस्तुलातून केलेल्या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.
लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराची ही घटना गुरुवारी रात्री सुमारे ९:३० वाजता केसनंद–वाडेबोल्हाई रस्त्यावर घडली. जमिनीच्या मालकीसंदर्भात सुरू असलेल्या वादातून सचिन राजाराम ढोरे, भिवराज हरगुडे आणि गणेश जाधव या तिघांनी एकत्र येत सुशील ढोरे यांच्यावर गावठी पिस्तुलाने गोळी झाडली. या हल्ल्यात सुशील ढोरे यांच्या पोटाच्या उजव्या बाजूला गोळी लागली असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि प्राथमिक तपास सुरु केला. घटनास्थळाची पाहणी करून साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे भिवराज हरगुडे आणि मोक्का गुन्ह्यातील जामिनावर सुटलेला आरोपी सचिन ढोरे या दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तिसरा आरोपी गणेश जाधव सध्या फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हल्ल्यात वापरण्यात आलेल्या शस्त्राचा तपास केला जात आहे. आरोपींचे आपापसातील संबंध, पूर्वीचे वाद, तसेच मोक्कासह इतर गंभीर गुन्ह्यांशी असलेली त्यांची संबंधितता यांचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.





