जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी तसेच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई
जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी तसेच अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम राबवली आहे. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये, दि.०५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजेपासून ते रात्री ११:०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ‘नाकाबंदी’ व ‘ऑल आऊट ऑपरेशन’ मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.
या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचा सक्रिय सहभाग होता. एकूण २६९ पोलीस अधिकारी व अंमलदार या कारवाईसाठी नेमण्यात आले होते. जिल्हा पोलिसांनी केलेल्या या विशेष कारवाईत खालीलप्रमाणे आकडेवारी समोर आली आहे. वाहनांची तपासणी दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात विविध नाकाबंदी पॉईंट्सवर एकूण २४५८ वाहने तपासण्यात आली.
अवैध दारू व गुन्हे संदर्भात प्रोव्हीशन कायदयान्वये (दारूबंदी) एकूण ९० गुन्हे दाखल करण्यात आले. जुगार कायदयान्वये एकूण ३४ गुन्हे तर अंमली पदार्थ (NDPS) ०१ गुन्हा दाखल करण्यात आले. तसेच हॉटेल/लॉजेस तपासणीत जिल्ह्यातील एकूण १३५ हॉटेल्स व लॉजेसची तपासणी करण्यात आली.
फरार/तडीपार आरोपी मध्ये एकूण ८२ तडीपार आरोपींना तपासण्यात आले. शस्त्र कायदा (Arms Act): २२ गुन्हे दाखल. वॉन्टेड/NBW (वॉरंट): एकूण १४८ वॉरंट बजावण्यात आले. इतर महत्त्वाची कारवाई: महा.पो.का.क. १२२ प्रमाणे एकूण १४ केसेस करण्यात आल्या.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ५ लाखांहून अधिक दंड वसूलः या मोहिमेदरम्यान वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायदा (MV Act): एकूण ६७१ केसेस करण्यात आल्या.
वसूल केलेला दंडः नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल रु. ५,१०,३५०/-(पाच लाख दहा हजार तीनशे पन्नास रुपये) इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व कायदा सुव्यवस्था चोख राखण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलीस दलाने स्पष्ट केले आहे.



