कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील मुरूम तपासणी करण्याची मागणी

जळगाव प्रतिनिधी – कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्सकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरुम (गौणखनिज) टाकण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जळगाव यांच्यावतीने आक्षेप नोंदविला असून याप्रकरणी चौकशी करण्यात यावी असे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना दिलेले आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, कृषी उत्पन्न बाजार समिती कॉम्प्लेक्स समोरच्या रस्त्यावर गेल्या सात आठ दिवसांपासून मुरुम टाकण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी टाकण्यासाठी मुरुम उत्खनन करायची परवानगी घेण्यात आलेली आहे का? तसेच परवानगी घेतलेली असल्यास किती मुरुम उत्खनन करण्याची परवानगी मिळालेली आहे व प्रत्यक्षात किती मुरुम उचलण्यात आलेला आहे ? याची चौकशी करून मोजमाप व पडताळणी करण्यात यावी. तसेच परवानगीशिवाय व बेकायदेशीररीत्या उत्खनन झालेले असल्यास, याकामी वापरण्यात आलेले सर्व वाहने, मशिनरी व उपकरणे जप्त करण्यात यावे.
निवेदन देतांना माजी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, माजी नगरसेवक सुनील माळी, राजू मोरे, रिजवान खाटिक, किरण राजपूत, रहिम तडवी उपस्थित होते.




