आर्थिक घडामोडीमहाराष्ट्रमाहिती तंत्रज्ञान

जळगाव जिल्ह्यातून आता एक-दोन नाहीतर तब्बल पाच राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत.

जळगाव : पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विकासाच्या बाबतीत कायम पिछाडीवर राहिलेल्या जळगाव जिल्ह्यातून आता एक-दोन नाहीतर तब्बल पाच राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत. दळणवळण सुविधा अधिक बळकट झाल्याने जिल्ह्याच्या कृषी व औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची आशा त्यामुळे व्यक्त होत आहे.

जळगाव हे मुंबई-हावडा आणि भुसावळ-उधना या लोहमार्गावरील महत्वाचे जंक्शन मानले जाते. येथून देशातील कोणत्याही दिशेला रेल्वेने प्रवासाची सोय उपलब्ध आहे. असे असले तरी शहरातून पूर्वापार जाणाऱ्या आणि अलीकडेच अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय महामार्गांचेही जिल्ह्याच्या विकासात तितकेच मोठे योगदान राहिले आहे. त्यापैकी एनएच ५३ हा सुरत (गुजरात) ते पारादीप (ओडिशा) पर्यंतचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. जो महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमधून जातो. आणि भारताच्या पश्चिम व पूर्व किनाऱ्यांना जोडतो. आशियाई महामार्ग जाळ्याचा भाग असलेला हा महामार्ग हाजिरा बंदराला पारादीप बंदराशी जोडतो. देशाच्या वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतो.एनएच ७५३ एफ महामार्ग जळगावहून पहूर, फर्दापूर, अजिंठा, सिल्लोड, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, नेवासा, वडाळा, अहिल्यानगर, पुणे, मावळ, दिगी पोर्टपर्यंत आहे. जळगावमधून पुणे जाण्यासाठी एकमेव पर्याय असलेल्या या महामार्गाने अजिंठा लेणीला सुद्धा जाता येते. हा महामार्ग आता मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाल्यास जळगावहून समृद्धी महामार्गाने मुंबई किंवा नागपूरकडे कमी वेळात पोहोचणे शक्य होईल. पुणे-छत्रपती संभाजीनगर एक्स्प्रेस हायवे अस्तित्वात आल्यानंतर जळगावहून पुण्याला देखील अवघ्या तीन तासांत पोहोचणे शक्य होणार आहे

एनएच ७५३ जे महामार्ग जळगावहून मनमाडकडे जाणारा एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. जो पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, नांदगाव मार्गे मनमाडपर्यंत जातो. या महामार्गाचे विस्तारीकरण (दुपदरी ते चारपदरी) करण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला असून, त्याचे बरेच काम पूर्णत्वास आले आहे. वळणावरील भूसंपादनाचा तिढा वेळेवर न सुटल्याने रखडलेल्या या महामार्गासाठी आता पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. कमी वर्दळीच्या या महामार्गाने जळगावहून मनमाड, चांदवडमार्गे थेट नाशिक देखील गाठता येते.

एनएच ७५३ एल हा इंदूरहून हैदराबादकडे जात असलेला राष्ट्रीय महामार्ग आहे. कृषी व औद्योगिक विकासाला नवे बळ देऊ शकणाऱ्या या महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. भारतमाला परियोजनेच्या पहिल्या टप्प्याचा भाग असलेल्या आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा या तीन राज्यांना जोडणाऱ्या या महामार्गासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपये निधी मंजूर आहे. हा महामार्ग जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमार्गे तेलंगणातील हैदराबादपर्यंत जाणार आहे. यामुळे इंदूर आणि हैदराबादमधील अंतर सुमारे १५० किलोमीटरने कमी होणार आहे. जळगावहून इंदूरला त्यामुळे फक्त चार तासांत पोहोचता येईल.

एनएच ७५३ बी महामार्ग मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरपासून गुजरात राज्यातील अंकलेश्वरपर्यंत असणार आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांना जोडणारा तो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. या महामार्गाच्या भूसंपादनातील अडथळे दूर होऊन पुढील कामाला गती मिळाल्याने जळगावसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील केळी क्लस्टरसारख्या कृषी-अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे. बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा, धुळे जिल्ह्यातील शिरपूर, जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातून जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!