BJP on Raj Thackeray : घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार

BJP on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 19 व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यातून राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली. आता भाजपने राज ठाकरेंवर पलटवार केलाय.
BJP on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) आज 19 वा वर्धापन दिन असून चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात सोहळा पार पडला. या सोहळ्यातून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कुंभमेळ्यातील (Kumbh Mela 2025) पवित्र स्नानाची खिल्ली उडवली. राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. त्यानंतर राज कपूर यांनी चित्रपट देखील काढला, लोकांना वाटलं गंगा साफ झाली. पण त्यात वेगळी गंगा होती. लोक म्हणाले अशी गंगा साफ असेल तर आम्हीही आंघोळ करायला तयार आहोत. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. आपली डोकी नीट हलवा, असे त्यांनी म्हटले. तर तसंच बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी आपल्यासाठी तेथील पाणी आणलं असता ते पाणी पिण्यास नकार दिल्याचा खुलासा देखील त्यांनी केला. आता यावरून भाजपने राज ठाकरेंवर पलटवार केलाय.
भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) म्हणाले की, मी स्वतः माझ्या कुटुंबासमोर तीन वेळेस कुंभमेळ्यात पवित्र स्नान केलं आहे. अनेक नेते, अभिनेते, उद्योगपती, साधू-संत सगळेच लोक त्या ठिकाणी पवित्र स्नानासाठी गेले. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की, देशभरातील 57 कोटी लोक त्या संगमावर आले. तिथले पाणी स्वच्छ होते. त्यामुळे जे गेलेच नसतील त्यांनी घरी बसून पाणी अस्वच्छ असे म्हणणे चुकीचे आहे. त्या 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात, असा पलटवार त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केलाय.
हिंदू धर्माच्या श्रद्धेचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे
राम कदम पुढे म्हणाले की, मोदी सरकार नद्या स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहे. गंगा नदीत आतापर्यंत लाखो फॅक्टरी आणि गटारांचे आऊटलेट्स होते. आता आपण बऱ्यापैकी ते कमी करत आणले आहे. आपल्याला अजून देखील काही काम करावे लागणार आहे. नद्या स्वच्छ झाल्या पाहिजे हा एक भाग आहे. पण, संगमाचे पवित्र स्नान हा पूर्णपणे श्रद्धेचा भाग आहे. त्याच्यामुळे यावर आरोप-प्रत्यारोप करण्यापूर्वी सनातन हिंदू धर्माच्या श्रद्धेचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे?
राज ठाकरे म्हणाले की, नुकतीच कोरोना महामारी होऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहोत. कुणालाही कुणाचे देणेघेणे नाही. आजवर मी कित्येक स्विमिंग पुलांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम केले. सुरुवातीला ते निळे होते, मात्र कालांतराने ते स्विमिंग पूल हिरवे होत गेले. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? एक नदी या देशातील स्वच्छ नाही. परदेशात ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस तिथल्या नद्या पाहतो तर त्या एकदम स्वच्छ असतात. आपण आपल्या इथे नद्यांना माता म्हणतो मात्र परदेशात असं होत नाही. तरीही त्या नद्या स्वच्छ आहेत. मात्र आपल्या इथल्या नद्यांमध्ये सर्व प्रदूषित पाणी सोडले जाते. राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. त्यानंतर राज कपूर यांनी चित्रपट काढला, लोकांना वाटले गंगा साफ झाली. पण त्यात वेगळी गंगा होती. लोक म्हणाले अशी गंगा साफ असेल तर आम्हीही आंघोळ करायला तयार आहोत. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. आपली डोकी नीट हलवा, असे त्यांनी यावेळी म्हटले.