घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील आयोध्या नगर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी उघडकीस आणत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक विधीसंघर्ष बालकाचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
आयोध्या नगर भागात राहणारे फिर्यादी पंढरीनाथ पाटील हे कुटुंबासह त्यांच्या मूळ गावी धानवड येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरात घरफोडी केली. सकाळी शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिल्यानंतर पाटील जळगाव येथे परतले. घराची पाहणी केली असता लाकडी कपाट उघडे असून त्यातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे आढळून आले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (a), ३३१ (३)(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाची नेमणूक करून तपासाच्या सूचना दिल्या. पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, पोहेकों किरण चौधरी, पोकाॅं विशाल कोळी आदींच्या पथकाने गोपनीय बातमी व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला.
त्यानंतर मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील पुनासा तहसील परिसरात सापळा रचून दि. ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली. अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे –
सुखदेव रामसिंग टाक (वय ३६),आकाश दिनेश वाघे (वय १९)
(रा. इनपुन पुनर्विकास, पोस्ट मंधाता, तहसील पुनासा, जिल्हा खंडवा, मध्यप्रदेश)
आरोपींकडून चोरी गेलेले १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच गुन्ह्यासाठी वापरलेले सुमारे ४ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन, लोखंडी पेंचिस, स्क्रू ड्रायव्हर, लहान चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकों किरण चौधरी व पोकाॅं योगेश घुगे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.




